शनिबद्दल बोलू काही लेखमाला:  भाग १  शनि ची जन्मकथा

(Astroshodh- astrologerinpune, vastuconsultantinpune, pune)

आजपासून शनि ग्रहाबाबत दर आठवड्यात एक अशी लेखमाला सुरू करीत आहे. आजच्या लेखात पुराणात वर्णन केलेल्या शनिच्या जन्माबाबतची माहिती आपण बघणार आहोत. नंतर पुढच्या लेखांमध्ये ज्योतिषशास्त्रीय दृष्टीकोनातून शनिबद्दल मी लिहित जाणार आहे.

आज शनि जयंती आहे. ते औचित्य साधून शनिदेवाच्या जन्माची कथा वाचनात आली होती ती लिहित आहे. शनिदेवाच्या जन्माची माहिती स्कंद पुराणातील काशीखंडमध्ये वर्णन केलेली आहे.

सूर्यदेवाशी राजा दक्षची मुलगी संज्ञा हिचा विवाह झाला होता. सुर्यदेवापासून तिला यमराज आणि यमुना अशी अपत्ये झाली होती. खरं म्हणजे सूर्य देवाचे प्रचंड तेज तिला सहन होत नसे. त्यासाठी संज्ञाने तपोबलाने स्वत:ची प्रतिकृती (छाया) निर्माण केली. छाया सूर्यदेवाकडे जाऊन संज्ञाच्या रुपातच राहू लागली आणि इकडे संज्ञा तप करायला जंगलात निघून गेली.

पुढे या छायेला सुर्यदेवापासून शनिदेव आणि भद्रा अशी अपत्ये झाली. वैशाख अमावस्येला जेव्हा शनिदेवांचा जन्म झाला तेव्हा पुत्र जन्माची वार्ता ऐकून सूर्यदेव आपल्या रथातून पुत्रमुख पाहण्यासाठी आले. तेव्हा शनिदेवांचा रंग काळा असल्याने सूर्यदेवाने शनिदेवांचा उपहास केला. ते म्हणाले मी एव्हढा तेजस्वी आहे आणि माझा मुलगा एव्हढा काळा कसा असेल? आपल्या आईवर संशय घेतल्यामुळे शनिदेवांना सूर्यदेवाचा प्रचंड राग आला आणि त्यांनी सूर्याकडे वक्र दृष्टीने बघितले. शनिची दृष्टी सूर्याच्या रथाच्या सारथ्यावर पडताच तो पंगु झाला व रथाचे घोडे अंध झाले. मग देवांनी समेट घडवून आणल्यावर कृपादृष्टीने शनिने पाहताच सूर्याच्या रथाचा सारथी व रथाचे घोडे पूर्ववत झाले. मात्र तेव्हापासून शनिदेवांचं व सूर्यदेवाचं शत्रूत्व सुरु झालं. पुढे छाया मुलांशी भेदभावाने वागू लागली, यमाला व यमुनेला सावत्रपणाने वागवू लागली. हे जेव्हा सूर्याला कळाले तेव्हा तो रागावून छायेला म्हणाला आपल्या मुलांशी भेदभावाने वागतेस हे योग्य नाही. तरीही छायेच्या वागणुकीत फरक पडला नाही. यमाने सूर्याकडे तक्रार करुन सांगितलं की ही फ़क्त शनिवर व भद्रेवरच प्रेम करते आणि माझ्याशी व यमुनेशी शत्रुत्वाने वागते. यादरम्यान सूर्यदेवाला छायेबाबतची हकिगत कळली होती.

यमाने तक्रार केल्याचं कळताच छायेने यमाला “तू प्रेतांचा राजा होशील” असा शाप दिला. तेव्हा सुर्यदेवाने तोड काढून मनुष्यांच्या पापपुण्याचा निवाडा करण्याच्या कामासाठी यमाची नियुक्ती केली आणि त्याचे दु:खहरण केले. मात्र छायेने दिलेल्या शापामुळे संतापलेल्या सूर्यदेवाने शनिदेवांना शाप दिला की “तुझ्या मातेच्या दोषामुळे तुझ्या दृष्टीतही क्रूरता राहील” त्यानंतर जेथे संज्ञा तप करीत होती तेथे जाऊन तिला प्रसन्न करून सूर्य आपल्याबरोबर घेऊन आले.

राग ओसरल्यावर सूर्याने शनिला उ:शाप दिला की फक्त वक्री अवस्थेत असतांनाच तुझी दृष्टी क्रुर असेल इतर वेळेस ती दृष्टी न्यायाधीशासारखीच राहील आणि प्रत्येकाच्या कर्माप्रमाणेच फळ तू देशील. तेव्हापासून जेव्हा जेव्हा शनि वक्री होतो तेव्हा तेव्हा त्याची क्रूर दृष्टीचा परीणाम आपल्याला तीव्रतेने होतांना दिसतो.