मकर राशितील गुरु-शनि युती आणि नशीबवान ६ राशि

दिनांक २१ डिसेंबर रोजी गुरु व शनि या ग्रहांची युती मकर राशित होत आहे. खरं म्हणजे मकर राशित गुरु नीच होतो, म्हणजे गुरुची चांगली फळे मिळत नाहीत. परंतू यावेळेस शनि मकर या त्याच्या स्वराशितच विराजमान आहे. याचबरोबर शनि शशमहापुरूष योगातही आहे. ( शशमहापुरूष योग म्हणजे काय व सध्या शनिचा शशमहापुरूष योग झाल्याने कोणत्या राशिंना जबरदस्त फायदा होणार आहे हे आपण उद्या बघू )  त्यामुळे गुरुचा नीचभंग राजयोग होत आहे. त्यामुळेच गुरुची मकर राशितील अनिष्ट फळे यावेळेस न मिळता उलट चांगली फळे मिळणार आहेत. (याचा कालावधी खरे तर २१ मार्चपर्यंत असणार आहे. परंतू आपण १५ जानेवारीपर्यंतच या फ़लादेशामध्ये विचार करणार आहोत. नंतर राशिबदल करणार्‍या सूर्य व इतर ग्रहांचा या योगावरही परीणाम होईल त्याची माहिती आपण त्या-त्या वेळेस घेऊच). चला तर मग बघूया कोणकोणत्या राशि नशीबवान आहेत ते.
वृषभ रास– भाग्यस्थानातील गुरू आपल्याला नशीबाची दारे या वेळेस उघडणार आहे. रेंगाळलेली बरीच कामे आता मार्गी लागणार आहेत. आत्मविश्वास वाढलेला असेल. आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. प्रवासयोग येतील. प्रवास लाभदायक ठरतील. लेखक, न्यायाधीश, शिक्षण क्षेत्राशी संबंधित लोक तसेच प्रिंटींग, पब्लिशींग या क्षेत्रातील लोकांना मोठ्या यशाचा काळ आहे.
कर्क रास– सप्तम स्थानातील गुरु जोडीदाराचा उत्कर्ष दाखवीत आहे. भागीदारीत ज्यांचा व्यवसाय आहे त्यांना विशेष लाभाचे योग आहेत. भावंडांच्या भेटीचे योग येतील. त्यांच्याकडून काही लाभ होतील. मित्र-मैत्रिणींच्या भेटी आनंद देतील. तुमच्या कार्यक्षेत्रात तुमच्या कामाची दखल घेतली जाईल. काही लाभही होतील.
कन्या रास– पंचमस्थानातील गुरु संततीबाबत शुभ समाचार घेऊन येईल. विद्यार्थ्यांना हा कालावधी यशदायक आहे. प्रेमिकांना लग्न ठरविण्यास अनुकूल ग्रहमान आहे. प्रवासयोग येतील. प्रवास लाभदायक ठरतील. आप्तेष्टांच्या भेटीचे योग येतील. आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल.
मकर रास– लग्नातील गुरु तुमचे मनोबल, आत्मविश्वास वाढविणार आहे. प्रवासाचे, मौज-मजा करण्याचे दिवस आहेत. विद्यार्थ्यांना व प्रेमिकांना अनुकूल ग्रहमान आहे. एखादी बढती, पगारवाढ किंवा कोणीतरी पाठीवर दिलेली शाबासकीची थाप तुमचा आनंद व्दिगुणित करणार आहे. जोडीदाराबाबत चांगली बातमी कळेल. विवाहोत्सूक व्यक्तींना अनुकूल काळ आहे.
मीन रास– लाभस्थानातील गुरु अत्यंत शुभ फळे देणार आहे. आर्थिक लाभ होतील. मित्र-मैत्रिणींच्या भेटी आनंददायक ठरतील. भावंडांची मदत मिळेल. लेखक व ब्लॉगर्सही चांगले काम झाल्याने खुश असतील. प्रवासयोग आहेत. प्रवास आनंद देतील. भागीदारीत व्यवसाय सुरु करायचा असेल तर त्यासाठीही अनुकूल ग्रहमान आहे. विद्यार्थ्यांना कमी श्रमात जास्त यश मिळेल.
मेष रास– दशमातील गुरु आपल्या कार्यक्षेत्रात नवीन उमेद निर्माण करणार आहे. वडीलधारी मंडळी तसेच कार्यक्षेत्रातील वरीष्ठ यांचे चांगले सहकार्य मिळेल. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. घरात आनंदी वातावरण असेल. आरोग्याच्या काही समस्या असतील तर आता त्यात सुधारणा दिसायला लागेल. आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल.