प्रस्तावना
सध्या कोरोना सगळीकडे धुमाकूळ घालत आहे. संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालेले आहे. एक प्रकारची स्तब्धता आलेली आहे. चीनमधील वुहान शहरात सुरू झालेला कोरोना आता संपूर्ण जगभरात पसरला आहे. लाखो लोकांचे जीव गेलेत, नोकऱ्या गेल्या, व्यवसाय बुडाले. एक प्रकारची दहशतच लोकांच्या मनावर बसलेली आहे. कोरोनाची भीती जवळपास सर्वच लोकांना वाटते आहे.
कोरोना मनवनिर्मित आहे का? कोरोना कधी संपणार? जनजीवन कधी सामान्य होईल किंवा कधी पूर्वपदावर येईल? यासारखे अनेक फोन कुलकर्णींना आलेत. ग्रहस्थितीचा अभ्यास करून ते सगळ्यांना उत्तरं देत गेलेत. बर्याच गोष्टी नव्याने उलगडत गेल्यात. दर शतकाच्या सुरुवातीला एक महामारी येते. मागील चार शतकांमध्ये बघितले असतां १७१९ मध्ये प्लेग, १८२० मध्ये हैजा, १९१८ मधे स्पॅनिश फ्लू, आणि आता २०१९ मध्ये कोरोना आला आहे. या महामारींमध्ये अक्षरश: लाखो लोकांचा बळी गेला आहे. गेल्या चार शतकामध्ये आलेल्या महामारींचा त्यांनी अभ्यास केला असता त्यांच्या असं लक्षात आलं की ठराविक प्रकारची ग्रहस्थितीच या महामारींना कारणीभूत ठरली आहे. फरक फक्त इतकाच होता की प्रत्येक शतकामध्ये महामारीसाठी कारणीभूत ठरणारी ग्रहस्थिती वेगवेगळ्या राशित आली होती. ती ग्रहस्थिती कोणत्या राशीशी संबंधित आहे त्यावरुन आजारांचे स्वरूप आणि त्या-त्या आजारामध्ये बाधित होणारे अवयव फक्त बदलले. याच पध्दतीने आणि ग्रहस्थितीचा विचार करुन पुढील शतकात येणारी महामारी कधी येईल, त्याचे स्वरुप काय असेल याचाही अंदाज या पुस्तकात त्यांनी बांधला आहे.
ज्योतिषशास्त्राची व मेडिकल अॅस्ट्रोलॉजीची प्रारंभिक माहिती यात असल्याने हे पुस्तक वाचण्यासाठी ज्योतिशसास्त्राची माहिती असलीच पाहिजे अशी आवश्यकता नाही. तुम्हाला या महामारीच्या काळात नियोजन करायला मदत मिळावी तसेच ज्योतिषप्रेमी व ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करणार्यांना काहीतरी नविन देता यावे हा या पुस्तकाचा हेतू आहे.